गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

"स्वच्छ भारत अभियान" आणि आपण


आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना‘चे उद्‌घाटन केले आहे. दिल्लीतील महर्षी वाल्मिकी मंदिरात पोहचून मोदींनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. या निमित्त भाषण करताना देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे.
आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. 

आपण विदेशाती शहरांतील स्वच्छता पाहून त्याचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वच्छता ही तेथे राहणाऱ्या लोकांमुळे आहे, त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीमुळे आहे, हे आपण विसरतो. आपल्यातील किती जण आपल्या घराबरोबर, आपला परिसर, आपले ऑफिस स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतात? किती जन आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगतात, आणि त्याचे अनुकरण करायला सांगतात? आणि स्वतः अनुकरण करतात. 

आज सार्वजनिक ठिकाणी, बसमध्ये, लोकल मध्ये, ऑफिसेस मध्ये, उद्यानांमध्ये, इमारतींच्या आवारात, रस्त्यावर सगळीकडे आपल्याला अस्वच्छता दिसेल. सिगारेटची थोटके, खाद्य पदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाकू गुटख्याच्या पिचकार्यांनी रंगवलेल्या भिंती दिसतील.

एकीकडे आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. मंगळावर आपले यान पोहोचले आहे. मात्र आपली शहरे, आपले गाव आपण अस्वच्छ करत आहोत. यात बदल केला पाहिजे.

याची सुरुवात आपण आपल्या पासून केली पाहिजे. आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो, तसे सार्वजनिक ठिकाणी, बसमध्ये, लोकल मध्ये, ऑफिसेस मध्ये, उद्यानांमध्ये, इमारतींच्या आवारात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच आपल्या मित्रांना, ऑफिसमधील सहकाऱ्यांना, आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगितले पाहिजे. साफसफाई करणे हे फक्त सफाई कर्मचाऱ्यांचे काम नसून, आपले पण कर्तव्य आहे. 

तरच आपण आपल्या भावी पिढीला एक आरोग्यमय आयुष्य देवू शकू.