सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

पुन्हा एकदा लोहगड...

बऱ्याच दिवसांनी ट्रेकिंग ला जायचा प्लॅन ठरला होता. व्हाट्सअप ग्रुपवर बरीच चर्चा झाल्यावर लोहगड ला जायचे ठरले. आमचा एक मित्र विजय, हा डेंग्यूने आजारी असल्यामुळे तो येणार नव्हता. मी, हनुमंत, अभिजीत आणि संदीप, आमचे १२ ऑगस्ट ला लोहगड ला जायचे नक्की झाले.

१२ ऑगस्ट ला सकाळी ८ वाजता सोमाटणे फाट्याला जमलो. मध्ये कामशेतला मस्त तर्री वाली मिसळ आणि स्पेशल चहा असा नाश्ता करून आम्ही आमची एनर्जी बॅटरी चार्ज करून घेतली. 

रविवार असल्यामुळे पुण्या मुंबई कडच्या टिपिकल पिकनिक छाप पर्यटकांची भरपूर गर्दी होती. 

आता गडाच्या पायथ्यापासूनच पायऱ्या बांधल्या आहेत. पण त्यामुळे गुढग्यांची मात्र वाट लागते. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा असे चार दरवाजे पार करून तासाभरातच आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो. 

वरती आल्याआल्या लगेचच डाव्या हाताला दर्गा आणि सदरेचे अवशेष दिसतात. दर्ग्याच्या उजवीकडे एका कोठाराचे बांधकाम आहे. सदरेवर आता दोन छोट्या तोफा ठेवलेल्या आहेत. दर्ग्याच्या एकदम मागे चालत गेल्यावर, पठाराच्या शेवटच्या भागातून एक धबधबा खाली कोसळत होता पण त्याचे पाणी मात्र वाऱ्याच्या वेगामुळे उलटे वर येत होते. या धबधब्याला रिव्हर्स वॉटरफॉल असेही नाव आहे. दर्ग्याच्या उजवीकडे टेकडावर शंकराचे मंदिर आहे. मंदिराशेजारीच अष्टकोन आकाराचे तळे आहे. 

या तलावाच्या पुढे काही अंतरावर सोळाकोनी तलाव आहे. तो पाहुन आम्ही विंचूकाट्याच्या दिशेला निघालो. तिकडे जाण्यासाठी आता दरीच्या डाव्या बाजुला रेलिंग लावले आहेत. एक छोटासा रॉकपॅच पार करून आम्ही विंचूकाट्यावर पोहोचलो. तिथे डाव्या बाजूच्या तटबंदीमध्ये एक दरवाजा आहे. तिथून एक वाट खालच्या बाजूला जाते. तटबंदीवरुन पवना धरणाचे बॅकवॉटर आपल्याला दिसते. या तटबंदीला आता दोन्ही बाजूने रेलिंग लावले आहे. तटबंदीच्या मधल्या मोकळ्या जागेत राजवाड्याचे अवशेष दिसतात.

पावसाळी वातावरण असल्यामुळे गडावर जोरदार वारे आणि पाऊस होता. थोडावेळ गडावर थांबून आम्ही गड उतरून खाली आलो. पायथ्याला मटकी भेळ, कांदा भजी आणि गरमागरम चहा पिला, तेव्हा कुठे बरं वाटलं. 

वाटेतील धबधब्यांमधें मध्ये उतरण्याचा मोह टाळून आम्ही घरी परतलो. 

पाऊस आणि धुक्यामुळे जास्त फोटो काढता आले नाहीत. तरी काही मोजके फोटो खाली देत आहे. 
धुक्यात लपलेला लोहगड
लोहगडाच्या पठारावर - सर्वात डावीकडे राजसदर आणि दर्गा, मध्यभागी महादेवाचे मंदिर आणि अष्टकोनी तलाव
रिव्हर्स वॉटरफॉल - वाऱ्याच्या वेगामुळे धबधब्याचे पाणी उलट्या दिशेने वरती येते
पवना धरणाचा जलाशय 
विंचूकाट्याच्या दिशेनेविंचूकाटाडावीकडून निलेश, हनुमंत, संदीप आणि अभिजीत.