मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

C8-10 ते D-403


बरोबर एक वर्ष होईल, आम्ही नवीन घरात राहायला आलो त्याला. नवीन घर प्रशस्त आहे. आजूबाजूला भरपूर मोकळी जागा आहे, मुलांना खेळायला घसरकूंडी, झोके आहेत,  छोटीशी बाग आहे, गणपतीचे देऊळ आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शांतता आहे. 


नवीन घराचा शोध संपला तो २०१५ मध्ये. माझी मुलगी अवनीचा जन्म २०१५ मधलाच. ती माझ्यासाठी खूप लकी आहे, मे महिन्यात तिचा जन्म झाला आणि जून २०१५ मध्ये आम्ही नवीन घर घेतले. 

ऑक्टोबर २०१७ मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यावर आम्ही नवीन घराचा ताबा घेतला. नवीन घरात शिफ्टिंग करण्यासाठी आम्ही उत्साहाने तयारीला लागलो. शिफ्टिंग ची तारीख नक्की झाल्यावर मी ऑफिसमधून ३ दिवसाची सुट्टी घेतली. लहान मोठे पुठ्ठयाचे बॉक्स, ब्राउन टेप, मार्कर आणले. काचसामान, लहान भांडी, माझी पुस्तके एकेका बॉक्स मध्ये भरले. मोठी भांडी पिंपे मध्ये भरली. प्रत्येक बॉक्सवर लेबल लावले. महत्वाची कागदपत्रे वेगळ्या पिशवीमध्ये ठेवली. कपडे, बिछाना बांधून ठेवला. 

घरात नुसता पसारा झाला होता. कितीतरी अडगळीच्या वस्तू आम्ही भंगारात दिल्या. त्या दिवशी खूप दमल्यासारखे झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी टेम्पोवाला आणि त्याची तीन माणसे आली. त्यांनी भराभर सामान टेम्पोमध्ये भरायला सुरुवात केली. सगळे सामान टेम्पोमध्ये भरल्यावर घर कसे रिकामे रिकामे दिसू लागले. 

असंख्य जुन्या आठवणींनी मन भरून आले. त्या आठवणींवर मी नंतर लिहिणार आहेच. नवीन घरी आल्यावर भराभरा टेम्पोवाल्याच्या माणसांनी सगळे सामान घरात पोहोचवले. तो दिवस आणि दुसरा दिवस, सर्व सामान, फर्निचर नवीन घरात लावण्यात गेला. 

याला आता एक वर्ष झाले आहे. नवीन जागेमध्ये आम्ही आता बऱ्यापैकी रुळलो आहोत.

जुने घर आम्हा सगळ्यांसाठी खूप लाभदायक होते. आता नवीन वास्तूसुद्धा तेवढीच शुभ आणि लाभदायक ठरेल.